आपण डॉक्टर का झालो? यापेक्षा आपण डॉक्टर म्हणून कसे घडलो..
- Dr. Pradnya Bansod

- Aug 1
- 3 min read
Updated: Aug 3
मी आणि डॉ. मानसी सहज गप्पा मारत असताना मेडिकल शिकतानाच्या, विशेषतः रेसिडेंट डॉक्टर म्हणून काम करत असतानाच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. खरं तर प्रत्येक डॉक्टरकडे रेसिडेन्सीच्या काळातील असंख्य आठवणींचा खजिना असतो. अनेक रुग्णांचे चेहरे आजही स्पष्ट आठवतात. त्यांची नावे जणू मेंदूवर कोरल्यासारखी वाटतात आणि ते प्रसंग आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहतात.
त्या काळात तहान, भूक, झोप यांचे भान राहत नसे. अविरत केलेले काम, झालेल्या चुका, त्यासाठी मिळालेली समज, गुरुजनांकडून मिळालेली शाबासकी, रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळालेली आत्मीयता आणि माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर माझ्या छोट्या रुग्णांच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य—या सगळ्या आठवणी काही क्षणांसाठी का होईना, "आपण डॉक्टर का झालो?" यापेक्षा "आपण डॉक्टर म्हणून कसे घडलो?" या प्रवासावर प्रकाश टाकतात.
एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर पोस्टग्रॅज्युएशनसाठी पर्याय निवडताना मी मनाशी ठरवले होते की, जर बालरोगशास्त्रात डिप्लोमा करायचाच असेल, तर तो फक्त के. ई. एम.मध्येच करायचा. सुदैवाने पहिल्याच फेरीत मला के. ई. एम.मध्ये डी.सी.एच.ची जागा मिळाली आणि त्याहीपेक्षा मोठा योग म्हणजे माझी नियुक्ती बालरुग्णसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये झाली.
रेसिडेन्सीच्या सुरुवातीचे काही दिवस हाऊस ऑफिसर म्हणून अत्यंत धावपळीचे होते. पहाटेच वॉर्डमध्ये पोहोचायचे आणि अनेकदा मध्यरात्रीनंतरच परत यायचे. इमर्जन्सी असेल तर वॉर्डमध्येच रात्र काढायची. या धकाधकीत सलग सात दिवस मी मोकळे आकाशही पाहिले नव्हते. आठव्या दिवशी ओपीडीकडे जाताना सहज वर पाहिले आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली. सुरुवातीला वरिष्ठ सांगतील ते फॉलो करण्यातच इतकी गुंतून गेले होते की स्वतःचेही भान उरले नव्हते.
कामाचा प्रचंड ताण होता. प्रत्येक रेसिडेंटवर मोठी जबाबदारी होती. सेकंड राउंडमध्ये अनेकांनी "वाडियात खूप काम आहे" किंवा "बेटरमेंट" म्हणून आपली जागा बदलून घेतली. घरूनही मला एखादी तुलनेने कमी कामाची शाखा निवडण्याचा सल्ला मिळाला. पण आयुष्यात पहिल्यांदाच मी स्वतःसाठी ठाम निर्णय घेतला—ही संधी मी सोडणार नाही. मी इथेच राहणार. आज, सतरावर्षांनंतरही त्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो.
या काळात मला बालरोगशास्त्रातील अनेक दिग्गज आणि अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जायचा. प्रत्येक कन्सल्टंटची काम करण्याची पद्धत वेगळी होती. निरागस, स्वतःचे दुःख शब्दांत सांगू न शकणाऱ्या बाळांचे अचूक निदान कसे करावे, त्याचबरोबर त्यांच्या चिंताग्रस्त आई-वडिलांचे समुपदेशन कसे करावे, त्यांना मानसिक आधार कसा द्यावा—हे सर्व आम्ही रोजच्या राऊंडमध्ये शिकत होतो.
अनेक जण आम्हाला म्हणतात, "ज्यांना त्यांचे दुखणे सांगताही येत नाही, अशा बाळांचे निदान तुम्ही करता, म्हणजे तुम्ही खरोखरच ग्रेट आहात." पण मला वाटते, बालरोगतज्ज्ञ होत असताना हळूहळू मुलांच्या डोळ्यांची भाषा समजू लागते. त्यांच्या नजरेतील अस्वस्थता, हावभाव, अगतिकता आणि रडण्यातील आर्तता यातूनच त्यांच्या वेदना समजतात आणि त्यांना बरे करण्यासाठी आम्हाला बळ मिळते.
एकदा त्यांना बरे वाटायला लागले की ते पुन्हा हसायला, खेळायला लागतात. तेव्हा जाणवते की बालमन किती निरागस आणि प्रामाणिक असते. याउलट प्रौढ रुग्णांमध्ये अनेकदा शारीरिकदृष्ट्या सुधारणा झाली तरी मानसिकदृष्ट्या ते खचलेलेच राहतात.
आमच्या युनिटच्या प्रमुख डॉ. इरा शहा मॅडम नेहमी म्हणायच्या, "मूल जर निवांत जांभई देत असेल, तर ते व्यवस्थित रिकव्हर होत आहे. आता त्याची फारशी चिंता करण्याची गरज नाही." अशा छोट्या निरीक्षणांतूनही किती मोठे धडे मिळायचे!
एकदा आमच्या वॉर्डमध्ये साधारण आठ-नऊ महिन्यांची डाऊन सिंड्रोम असलेली तीन बाळे एकाच वेळी दाखल होती. एक मराठी, एक मुस्लिम आणि एक गुजराती कुटुंबातील. डाऊन सिंड्रोममधील वैशिष्ट्यपूर्ण चेहऱ्यामुळे ती तिघे इतकी सारखी दिसत होती की प्रत्येकालाच त्यांचे कौतुक वाटत होते.
तीनही बाळे वेगवेगळ्या गुंतागुंतींमुळे दाखल झाली होती; पण त्या एका आजाराने तीन वेगवेगळ्या धर्म-पंथातील कुटुंबांना एकमेकांच्या जवळ आणले होते. "आपल्याच बाळाला हा आजार का?" या प्रश्नाने व्याकूळ झालेल्या पालकांना, आपल्यासारखेच इतर पालक पाहून मानसिक आधार मिळताना आम्ही प्रत्यक्ष अनुभवला.
वाडिया हॉस्पिटल हे टर्शियरी केअर सेंटर असल्यामुळे अनेक दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या आजारांचे रुग्ण तिथे येत असत. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा असली तरी डोळ्यांत आशेची एक ज्योत आणि असंख्य अनुत्तरित प्रश्न असायचे. योग्य निदान आणि उपचार समजावून सांगितल्यानंतर त्यांचा आमच्यावर इतका विश्वास बसायचा की अनेकदा ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, आर्थिक समस्या आणि मनातील भीतीही आमच्यासमोर मोकळेपणाने व्यक्त करायचे. तेव्हा जाणवले की ही ताकद आपल्या ज्ञानापेक्षा आपल्या संवेदनशीलतेत—"Empathy" मध्ये आहे.
याच संदर्भात मला एमबीबीएसच्या पहिल्या दिवसाची एक आठवण कायम स्मरणात आहे. प्रवेशानंतरच्या ओरिएंटेशनमध्ये आम्हा सर्वांना विचारले गेले, "तुम्ही मेडिकलमध्ये प्रवेश का घेतला?" माझ्याकडे त्या वेळी ठोस उत्तर नव्हते. खरं कारण इतकंच होतं की गणित अवघड वाटत असल्यामुळे मेडिकलची वाट निवडली. पण ते उत्तर तिथे देणे योग्य वाटले नाही. म्हणून मी सहज सांगितले, "माझ्या आई-वडिलांची इच्छा होती."
मात्र माझ्या वर्गातील एका मुलीने उत्तर दिले, "मला रुग्णांबद्दल खूप सहानुभूती वाटते. त्यांची सेवा करायची आहे म्हणून मी मेडिकलमध्ये आले." तिचे उत्तर ऐकून मी खूप प्रभावित झाले. पण त्यानंतर सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला.
ते म्हणाले, "फक्त Sympathy (सहानुभूती) घेऊन डॉक्टर होता येत नाही. सहानुभूती आपल्याला रुग्णांच्या वेदनेपासून दूर ठेवते; पण Empathy (संवेदनशीलता) आपल्याला त्यांच्या वेदना समजून घेण्याची ताकद देते. खरी रुग्णसेवा करायची असेल, तर Empathy आवश्यक आहे."
या वाक्याचा खरा अर्थ मला रेसिडेन्सीच्या काळात दररोज अनुभवायला मिळाला. हाऊस ऑफिसर म्हणून दिवस-रात्र काम करताना, न थकता धावताना आम्हाला पाहून अनेकदा रुग्णांचे नातेवाईक स्वतःहून आमच्यासाठी चहा घेऊन यायचे. कदाचित त्यांनाही आमच्याबद्दल Empathy वाटत असावी.
गुरुपौर्णिमा किंवा शिक्षक दिनी आपण आपल्या शिक्षकांना, पुस्तकांना आणि आई-वडिलांना वंदन करतो. पण प्रत्येक डॉक्टरसाठी यांच्याबरोबरच प्रत्येक रुग्णही एक गुरु असतो. त्याच्या आजारातून, त्याच्या वेदनांतून आणि त्याच्या उपचारांच्या प्रवासातून मिळणारे अनुभवच डॉक्टरला खऱ्या अर्थाने घडवत असतात.
याच अनुभवांच्या छिन्नीच्या घावांनी एक डॉक्टर घडत जातो.
सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
डॉ प्रज्ञा बनसोड


Comments