विद्यार्थी हेच माझे दैवत
- Samvedana Event.
- Aug 4
- 4 min read
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल व संवेदना आरोग्य प्रसार केंद्राचे उन्हाळी शिबिर खालकोनी येथे आयोजित करण्यात आले होते. तेथे मी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गेलो होतो. अगदी कमी वेळात ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आपले हस्ताक्षर सुधारण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदविला. या शिबिरात मुलांना पथनाट्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. हे सारे पाहताना नकळत माझे मन नूतन मूकबधिर विद्यालयात जाऊन पोहोचले. प्रत्यक्ष जाता आले नाही, तरी मन कोठेही, कधीही जाऊ शकते, फिरून येते.


"विद्यार्थी हे माझे दैवत!" हे मी केवळ बोलण्यापुरते किंवा तोंडदेखले म्हणत नाही. मुख्याध्यापक म्हणून काम करताना जन्मतःच मूकबधिर असलेले माझे विद्यार्थी माझे झाले आणि मी त्यांचा झालो. काही अनुभव आयुष्याला खूप काही शिकवून जातात. कितीतरी आठवणी आणि घटना आजही मनावर खोल ठसा उमटवून आहेत. त्या विद्यार्थ्यांनीच माझे भावविश्व आणि अनुभवविश्व समृद्ध केले.
सुमारे बारा वर्षांपूर्वी मी सेवानिवृत्त झालो; पण शाळेच्या सुखद आठवणी आजही मनात पुन्हा पुन्हा रुंजी घालतात. अशा आठवणी खूप आहेत, पण त्यापैकी काही ठळक आठवणी सांगाव्याशा वाटतात, ज्या नाट्य आणि अन्य कलांशी संबंधित आहेत.
१९९० च्या दशकात त्या वेळचे शिक्षण उपसंचालक शशिकांत दैठणकर यांनी महाराष्ट्रातील शाळांसाठी एक प्रार्थना सादर केली होती —
शाळा हे माझे मंदिर आहे.
विद्यार्थी हे माझे दैवत आहे.
दुरितांचे तिमिर जावो, ही माझी प्रार्थना. समाजाचा आशीर्वाद हा माझा प्रसाद.
ही प्रार्थना मला फार भावली. म्हणूनच मीही ती माझ्या शाळेच्या दर्शनी भागावर सर्वांना दिसावी म्हणून लावली होती. प्रार्थना फळ्यावर लिहिणे हा शाळा सुशोभीकरणाचा एक भाग होता; पण या प्रार्थनेचा प्रत्यय मला अख्ख्या सेवाकाळात आला.
मी ज्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन केले, ते सर्व विद्यार्थी जन्मतःच मूकबधिर होते. म्हणजे ते ऐकूही शकत नव्हते आणि बोलूही शकत नव्हते. अशा विद्यार्थ्यांचा कल पाहून-पाहून शिकण्याकडे असतो. तात्पर्य, हे विद्यार्थी अतिशय अनुकरणप्रिय असतात. त्यात माझी शाळा निवासी होती. निवास, भोजन आणि शिक्षण या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने सर्व विद्यार्थी चोवीस तास माझ्या निगराणीखाली असत.
नक्की आठवत नाही, पण २००१ मधील ती घटना असावी. नाट्यशाळा, मुंबई या संस्थेचे शाळेला पत्र आले. मुंबई येथे मूकबधिर विद्यार्थ्यांच्या नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात आमच्या शाळेचा सहभाग असावा, असे मला वाटत होते. मी सर्व शिक्षकांशी चर्चा केली आणि स्पर्धेत भाग घ्यायचाच, हे निश्चित झाले.
"उःशाप" नावाचे नाटक आम्ही बसविले. कचरा गोळा करणाऱ्या मुलांनी हे काम न करता शाळेत जावे, शिक्षण घ्यावे, ही त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना होती. मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये अंतिम स्पर्धा होती. आम्ही नाटकातील सहभागी विद्यार्थ्यांसह सर्व तयारीनिशी स्पर्धास्थळी पोहोचलो.
महाराष्ट्रातील अनेक अपंग विद्यार्थ्यांच्या शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. नाट्यगृहात अंधार होता. आमच्या शाळेचा पुकारा झाला आणि आमचे विद्यार्थी नाटक सादर करण्यासाठी रंगमंचावर दाखल झाले. पुन्हा अंधार झाला आणि नाटक संपल्यानंतर विद्यार्थी हॉलमध्ये येऊन बसले.
नाट्यस्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी हॉलमधील दिवे सुरू करण्यात आले. बक्षीस वितरण सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार होते. स्वतः नाना पाटेकर यांना स्टेजवर पाहून मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या.
अलीकडे उत्सुकता वाढविण्यासाठी वेगळी घोषणा करण्याची पद्धत आहे. प्रथम तिसरा क्रमांक, नंतर दुसरा क्रमांक जाहीर करण्यात आला. आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती — प्रथम क्रमांक कुणाचा?
आणि एवढ्यात पुकारा झाला — *"प्रथम क्रमांक पटकाविला आहे अमरावतीच्या 'उःशाप' या नाटकाने!"* आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक स्टेजवर पोहोचलो. नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्वीकारले. अमोल या विद्यार्थ्याने शालेय विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. नानांनी त्याला कडेवर उचलून घेतले आणि त्याचे प्रेमाने मुके घेतले. हा भावस्पर्शी प्रसंग मी आजही विसरू शकत नाही.आमचा आणि स्पर्धांचा प्रवास सुरूच राहिला. शिक्षक मेहनत घेत आणि मुले त्या मेहनतीला न्याय देत असत. त्यानंतरच्या स्पर्धेत रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्तेही आम्हाला सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे उदयपूर, राजस्थान येथे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांतील अपंग विद्यार्थ्यांसाठी लोकसंस्कृती सादर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दहा दिवसांचे निवासी शिबिर होते आणि त्यात विविध प्रशिक्षणांचाही समावेश होता.
आमच्या शाळेतर्फे महाराष्ट्रातील भूपाळी, कीर्तन, अभंग आणि लावणी अशा लोकपरंपरा सादर करण्यात आल्या. त्यालाही प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हेच सादरीकरण आम्ही अमरावती येथील सांस्कृतिक महोत्सवातही केले. त्यालादेखील मा. प्रवीणभाऊ पोटे यांनी अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले.
या विद्यार्थ्यांना आम्ही बाबासाहेब पुरंदरे यांचे सुविख्यात "जाणता राजा" हे नाटकही दाखविले. या विद्यार्थ्यांमुळे मला मुंबई येथे भारतातील सर्वात मोठे युद्धनौकेचे जहाज 'विक्रांत' पाहायला मिळाले. या विद्यार्थ्यांमुळेच मला सिकंदराबाद येथील एअर फोर्स स्टेशन पाहण्याची संधी मिळाली.
आमच्या शाळेत या मूकबधिर विद्यार्थ्यांना केवळ अठरा वर्षांपर्यंत शिक्षण देण्याची सोय होती. शालेय शिक्षणाबरोबरच आम्ही त्यांना चित्रकला परीक्षेची तयारी करून देत होतो. चित्रकला स्पर्धेत आमच्या तीन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.
चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी आमच्या शाळेला २००१ मध्ये पुन्हा एक मोठी संधी दिली. प्रजासत्ताक दिन परेडसाठी अपंग विद्यार्थ्यांच्या शाळांना सहभागी करून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला होता. आम्ही धाडस करून आमचा सहभाग संस्थेला कळविला.
विद्यार्थी जेव्हा दिल्लीला जाण्यास निघाले, तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ. गोविंद कासट आणि प्रा. डॉ. संजय तिरथकर हे व्यक्तिशः उपस्थित होते. दिल्ली येथे विद्यार्थ्यांचे एक महिन्याचे वास्तव्य झाले. गणराज्य दिन परेडमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी पुन्हा शाळेत परतले.
शाळा मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी असली, तरी आमचे कितीतरी विद्यार्थी आज अभिमानाने सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. आमच्या शाळेचे सोळा विद्यार्थी सरकारी सेवेत आहेत. दोन मुली जलसंपदा विभागात, एक मुलगा राष्ट्रीय संस्था 'निरी', नागपूर येथे आणि एक मुलगी माझगाव डॉकयार्ड, मुंबई येथे कार्यरत आहे. या सर्वांना मी त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटून आलो आहे. आज हे सर्व विद्यार्थी त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. मनाने मनाशी जुळलेले आमचे हे स्नेहबंध शब्दांच्या पलीकडचे काहीतरी देऊन जातात. त्या स्मृतींचा सुगंध आजही दरवळतो आहे.
म्हणूनच मी म्हणतो - "विद्यार्थी हेच माझे जीवन आहे. तेच माझे दैवत आहेत"
दामोदर सबाने
अमरावती



Comments