top of page

आषाढाचे निसर्ग रूप !

नभात दाटली सावळ्या मेघांची छाया धरणीने पांघरली हिरवीगार माया आषाढाच्या सरींनी ऋतू हा नहाला निसर्गाच्या रूपात जीव हा हरपला...



आषाढमास म्हणजे कडक उन्हाळ्यानंतर तृप्त झालेल्या धरणीचा आणि निसर्गाच्या अदभूत रूपाचा उत्सव ! आषाढ हा वर्षातला चौथा आणि पावसाळ्याची सुरुवात करणारा महत्त्वाचा महिना आहे. या काळात पावसाळा सुरू होतो, त्यामुळे निसर्गात नवीन चैतन्य निर्माण होते. आषाढ म्हणजे निसर्गाचे अद्भुत आणि बहरलेले रूप ! हा काळ म्हणजे पावसाची संततधार, धुक्याची चादर आणि काळ्याभोर ढगांनी वेचलेले नयनरम्य आकाश होय. धरणीमाता हिरवा शालू पांघरते. आषाढातील मुसळधार पावसामुळे डोंगरदऱ्या आणि शेतशिवारे हिरवीगार होतात. रानफुलांचा बहर आणि गवताची मखमल मन मोहून टाकते. सकाळी आणि संध्याकाळी डोंगरांवरून किंवा दऱ्यांमधून वाहणारे पांढरे शुभ्र धुक्याचे लोट एखाद्या स्वप्नवत वातावरणाची अनुभूती देतात. धुक्याची शाल कशी मनाला मोहिनी घालते. कधी आषाढात आकाशात काळेकभिन्न ढग दाटून येतात. लहान-मोठे ओढे, धबधबे आणि नद्या दुधडी भरून वाहू लागतात. खळाळत वाहणारे पाणी निसर्गाचे संगीतच जणू ऐकवते....

आषाढातील निसर्गाचे हे रूप केवळ डोळ्यांना सुख देत नाही तर निसर्गाचा हा उत्सव मानवी मनाला, शेतकऱ्याला आणि कवी कल्पनेला एक नवी ऊर्जा देतो. संततधार पावसामुळे अवघी धरणी हिरवीगार होते. शेतात नवे अंकुर डोकावू लागतात. झाडांची पाने धुऊन निघाल्याने अधिक चमकदार आणि टवटवीत दिसतात. आषाढात आकाश कधीच मोकळे नसते.नभांचे सावळे रंग आणि ढगांची दाटी दृष्टीला सुखावणारी असते. कवी कुलगुरू कालिदासाने “मेघदूत “ या काव्यामध्ये आषाढीच्या पहिल्या दिवशी दिसणाऱ्या आकाशाचे फार सुंदर वर्णन केले आहे. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिस्ट सानुम् । वप्रक्रिडा परिणात गजप्रेक्षणीयं ददर्श ।। आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी पर्वताच्या शिखराला टेकलेला ढग असा दिसला, जणू एखादा हत्ती मातीच्या ढिगार्‍यावरच खेळतो आहे. आषाढाचे सुंदर आणि रौद्र रूप यांचे फार सुंदर वर्णन करणारी कविता आहे, कळोनी आले नभाला आला आषाढ आला काळा ढगांचा वेढुनी वेढा नभास गेला चातक पक्षी आतुरतेने वाटची पाहे थेंब टपोरा धरणी वरती झेलत राहे... कोसळणारे धबधबे आणि वाहते झरे निसर्गाच्या सौंदर्यात भरच घालत असतात. डोंगरमाथा हिरवागार शालू हा नेसे धबधब्यांचे पांढरे पाणी खळाळून हसे मातीचा तो सुटला सुगंध सुखावून जाई निसर्गाची ही किमया न्यारी रुप विलोभनीय पाही... कोरडे पडलेले झरे आणि नद्या आनंदाने ओसंडून वाहू लागतात. पाण्याचा हा खळखळाट निसर्गाला वेगळे संगीत प्रदान करतो. ग्रामीण भागामध्ये आणि डोंगराळ प्रदेशात धुक्याची चादर पसरलेल्याने गूढ धुके आणि गारव्याचा सुखद अनुभव प्रत्येकाला येतो. हे विलोभनीय आषाढ रूप स्त्रीच्या भावनांशी तरल आणि अतिशय सुंदर रीतीने जोडलेले आहे. धरणीने पांघरलेली हिरवी शाल आणि निसर्गाचा अप्रतिम शृंगार स्त्रीला स्वतःच्या सजण्याचीच आठवण करून देतो.आषाढ हा सृजनाचा महिना असून या मातीतून अंकुर फुटतात. स्त्री ही सृजनाचे प्रतीक असल्याने निसर्गाच्या या नवनिर्माणाच्या प्रक्रियेत तिला आपलेच प्रतिबिंब दिसते. मनात व्याकुळता निर्माण होणे हे स्त्रीला भावलेले आषाढाचे हळवे रूप आहे. आषाढी सरींच्या साथीने ती आपल्या भावनांना वाट मोकळी करून देते. पावसाच्या धारा जणू तिच्या डोळ्यातील विरहाश्रु बनून बरसतात. आपले दुःख मग ती निसर्गाच्या सोबतीने हलके करते. महाराष्ट्रातील स्त्रीसाठी आषाढाचे सर्वात पवित्र आणि जिव्हाळ्याचे रूप म्हणजे आषाढी एकादशी. विठ्ठलाला माऊली आई मानले आहे. आषाढ सुरु झाला की वारकरी स्त्रियांना पंढरीची ओढ लागते. विठ्ठलाचे पंढरपूर म्हणजे जणू माहेरी जाण्याचा आनंद!! संतांच्या अभंगातून आणि ओव्यात स्त्रियांनी आषाढातल्या या भक्तीरसाला आणि विठ्ठल भेटीच्या ओढीला शब्दबद्ध केले आहे. पंढरीची ओढ विरहाची गाठ आषाढाच्या सरींची हीच ती साथ कधी डोळ्यातील पाणी कधी भक्तीचे गान आषाढात हरपले स्त्रीचे भान... स्त्रीच्या मनातील आषाढ हा केवळ एक ऋतू नसून ती भावोत्कट अवस्था आहे. जेथे प्रेम, विरह, विठ्ठल रंगात रंगून जाणारी भक्ती आहे आणि नवनिर्मिती, हे सगळे एकत्र विरघळतात. आषाढांमध्ये कडक ऊन नसते तर एक संथ, मंद प्रकाश आणि गारवा असतो. शांतता आणि आत्मचिंतनाचा सुंदर समन्वय साधणारा असा हा आषाढ निसर्गाने मांडला हा भक्तीचा सोहळा झाडे वेली नाचती आनंद झाला गोळा तुषार पाण्याचे उडती, वारा गातो गाणे आषाढाच्या रूपात दिसे विठ्ठलाचे असणे... वारकरी संप्रदायाचे आषाढाशी अतूट नाते आहे. भक्तीचा परमोच्च बिंदू साधलेल्या संतांच्या पालखी घेऊन वारकरी लाखो मैलांचा प्रवास करून, याची देही याची डोळा विठ्ठलाचे रूप पाहून जीवन कृतार्थ झाल्याचे समाधान मिळवतात. याचाच अर्थ आषाढ म्हणजे केवळ पावसाच्या सरींचा महिना नाही तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक रंगात नाहून निघणारा भक्तीचा उत्सव आहे. महाराष्ट्राच्या मनाच्या निस्सीम श्रद्धेचा महिना आहे. वारीच्या माध्यमातून समता, बंधुभाव जोपासत, माणसाला माणसाशी आणि परमेश्वराची जोडणारा हा उत्सव आहे! अशा निसर्गाचा पुनर्जन्मोत्सव आणि भक्तीचा महोत्सव याला ही शब्द वंदना ! रंजना पांडे


 
 
 

Comments


bottom of page