top of page

Women Empowerment 2026

तू पथदर्शी ..... तू पथदर्शी, स्वयंसिद्ध तू ,पथदर्शी हो, नव्या मनुसी घडवाया भोग्यवस्तू ना, स्वतंत्र सबला ,पूरक शक्ती पुरुषाला । अन्यायासी झुंज देऊया आश्वासक हो सकलांना सृजनशक्तीची हीच सार्थता, फुलवित फुलवित फुलताना । महिला दिनी स्त्रीचे हे रूप, समाजापुढे प्रस्थापित करताना स्त्रीला “स्व”रूपाची ओळख होणे गरजेचे आहे .आज आत्मविस्मृतीतून येणाऱ्या न्यूनगंडातून चुकीच्या पद्धतीची स्त्री -पुरुष समानता ते मिळवू तर पाहत नाही ना ? याचा विचार होणे अगत्याचे आहे . डायन मेरी चाईल्ड यांचे मते,” स्त्री ही संपूर्ण वर्तुळ आहे. तिच्या आत निर्मितीची , संगोपन करण्याची आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे .” विविध कालखंडामध्ये तिने स्त्री शक्तीचा आविष्कार घडवला आहे. पौराणिक कालातील सीता,मंदोदरी, वेदकालीन गार्गी,मैत्रेयी , इतिहासकालीन राणी लक्ष्मीबाई, जिजामाता , अहिल्याबाई होळकर ,सामाजिक सुधारणांच्या अभ्युदयाच्या काळात पहिल्या किरण ठरलेल्या सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, डॉ. आनंदी गोपाळ जोशी ..किती नवे घ्यावीत ? या यांच्यासारख्या अनेक कर्तृत्व शालिनींच्या रूपाने प्रकाशमय होताच स्वतः सोबतच समाजातील सर्व शोषित स्त्रियांच्या जीवनातील अंध:कार दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला .अन्याय्य रूढी वर पहिला घाव घालून परिवर्तनाची नांदी करणाऱ्यांचे नामावलीमध्ये अशी अनेक नावे आहेत. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय , अत्याचारांचे काहूर माजलेले होते त्या त्या वेळी यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत । अभियुत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ।

भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत आपल्याला अशा स्त्री शक्तीचा साक्षात्कार होतो. पथदर्शी म्हणून त्यांनी स्वतःला सिद्धच केलेले आहे . स्त्रीसाठी जे जे पर्यायी शब्द आहेत ते पहा. “महिला” म्हणजे महनीय,“मानिनी “म्हणजेच स्वाभिमानी, ”जननी, दुर्गा, नारी” शक्ती स्वरूपिणी “ विरांगना” ,”मातृशक्ती”, “ब्रह्मवादिनी” ब्रह्म जाणणारी म्हणजे अतिशय ज्ञानी. हे सर्व स्त्रीच्या ज्ञानी,साहसी, आत्मनिर्भरता या गुणांचे सगुण साकार रूप असून ते प्रत्येक कालखंडात प्रगट झालेले दिसून येते. “A strong woman stands for herself. A stronger woman stands everybody else.” ही वस्तुस्थिती आहे. असे असताना देखील तिचे आजही समाजाकडून शोषण का केले जाते ? तिला कमी का लेखले जाते, याचा विचार होणे अगत्त्याचे आहे.

आज सर्व क्षेत्रात स्त्री आघाडीवर असतानाही लिंग समभावासाठीचा तिचा संघर्ष संपलेला नाही. कारण स्त्री पुरुष समानतेच्या संकल्पनेला ईर्षा, मत्सर, स्पर्धा यांचा शाप लागलेला आहे. गतकालीन युगाच्या स्त्री अस्मितेच्या आणि कर्तृत्वाच्या पावलांचा मागोवा घेत चालताना स्त्री-पुरुष परस्पर पुरकतेवर दृढविश्वास व्यक्त करून समाजाची वाटचाल होईल तेव्हाच स्त्री जीवनावर आलेली अन्यायाची काजळी दूर होईल आणि पुढील वाटचाल तेजोमय होईल. समाजामध्ये समतेचे वातावरण निर्माण झाल्यास, सतत अन्याय अत्याचारांच्या वेदीवरील बळी ठरण्याची धास्ती स्त्रीच्या मनातून दूर होऊन सुरक्षित वातावरणात तिला मुक्त श्वास घेता येईल.स्त्री पुरुष जोडीने स्वतःच्या उन्नतीसोबत समाजाचे उन्नयन करण्याचे ध्येय त्या साकार करू शकतील.

स्त्रीने स्वतःला “धारिणी ,तारिणी, पोशिणी” म्हणून सिद्ध केलेले असतानाही असुरक्षिततेचे “अंधार पर्व “आजही संपलेले नाही. तिचे हक्क डावलले जात आहेतच .पारंपारिक पुरुषी वर्चस्वातून निर्माण झालेली आव्हाने स्वीकारताना आजची स्त्री, समानतेच्या मृगजळाच्या शोधात भरकटण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दृष्टीपथात येते आहे . हे चित्र बदलण्यासाठी पाश्चात्यांच्या भोगवादी संस्कृतीचे अंधानुकरण न करता देह सौंदर्यापेक्षा बुद्धी सौंदर्याच्या कक्षा विस्तारणे आवश्यक आहे. एक व्यक्ती म्हणून जे मुळात स्त्रीचेच आहे असलेले विचार स्वातंत्र्य समाज हिरावू पाहत आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण स्वतःच्या हाती ठेवण्याचा म्हणजेच स्वयंनिर्णयाचा अधिकार असून तो मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा . स्वयंनिर्णयाच्या सोबत जबाबदारीचे भान तर हवेच पण परिणामांना सामोरं जाण्याची ताकददेखील पाहिजे, मनाची आणि शरीराचीही ! “वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि “हे स्त्रीचे वर्णन इतिहासाने वेळोवेळी सार्थ ठरवलेले आहे. आपल्यासाठीचे ते दीपस्तंभ आहेत ,जीवननौका योग्य दिशेला वळवणारे !!

स्त्रियांनी वेळेनुसार, प्रसंगानुरूप स्वतःमध्ये सकारात्मक बदल करताना स्वतःच्या निसर्गदत्त क्षमतांचा सार्थ अभिमान राखत योग्य रीतीने त्यांचा उपयोग करायला हवा .यामुळे स्त्रीची आंतरिक शक्ती जागृत होईल आणि ही निर्माण होणारी ऊर्जा, तिला “पुरुषी” बनवण्याच्या लालसेपासून वाचवू शकेल. “स्त्रीमुक्ती आणि स्त्री स्वातंत्र्याच्या” बेगडी स्वरूपाच्या पडणाऱ्या भुलावणीतून मुक्त होऊन गाभ्यापर्यंत पोहोचण्याची तिची वाटचाल यामुळे नक्कीच सुरु होवू शकते. निसर्गाच्या विरोधात न जाता स्वतःच्या उणीवांना दूर सारणे गरजेचे आहे.या उलट आपल्या बलस्थानांचा अधिकाधिक विकास करून ते बळ राष्ट्र विकासासाठी वापरता येते.

मिशेल ओबामा म्हणतात, “महिला म्हणून आपण काय साध्य करू शकतो, याला मर्यादा नाही “ ! स्त्रीत्वाचा हा मोठाच गौरव आहे .एक हुशार स्त्री स्वतःचा मुकुट स्वतःच निर्माण करते. ती इतर स्त्रियांना स्वतःच्या वैभवापासून वंचित करत नाही कारण तिला हे पक्के ठाऊक आहे, ती स्वतः बलवान असून स्वतःशी स्पर्धा करून अधिकाधिक उंची गाठण्याच्या प्रयत्नात असते.

“असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर“ हा आत्मविश्वास तिच्यामध्ये उपजतच आहे. महिला दिन म्हणजे विश्वातील आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि अन्य विविध क्षेत्रात समस्यांवर मात करून आयुष्याचा लढा यशस्वीरितेने लढणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या सुरक्षिततेची, हक्काची हमी देण्याचा, त्यांच्या राष्ट्रापती असलेल्या योगदानाची कदर करण्याचा, सन्मान करण्याचा दिवस आहे. जागतिकीकरणामुळे “भोग्य वस्तू” म्हणून निर्माण झालेली स्त्री प्रतिमा दूर करून समाजामध्ये लिंग समभाव जागृत करणे अगत्याचे आहे. समाजाच्या मन:पटलावरून अशी प्रतिमा हद्दपार करण्याचा आणि मानव म्हणून स्त्री प्रतिष्ठापना करण्याचा हा दिवस ठरावा. महिलांच्या गौरवार्थ म्हणावेसे वाटते, शोधता वाटा नव्या खाचखळगे लागता उल्लंघण्याची जिद्द आहे मार्ग नाही एकला । संघटित हो मातृशक्ती ही, दुष्ट शक्तीसी लढण्याला समता, शांती, मनी सदयता ब्रीद हवे हे जगण्याला । हे ब्रीद मनात ठेवून पुढे जाणाऱ्या सर्व महिलांना स्त्री दिनाच्या शुभेच्छा आवाहन करावयाचे आहे, प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे । स्वप्नांना तुझ्या नवी क्षितीजं लाभू दे ।। श्रीमती रंजना पांडे


 
 
 

Comments


bottom of page