DHH - Editorial
- Dr. Pradnya Bansod

- 7 days ago
- 3 min read
सृष्टीच्या निर्मितीचा, नव-नवीन संकल्प करण्याचा, वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतिक असणारा गुढीपाडवा,या पावन पर्वासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

आजही आपल्या विचारांनी सर्वांचे मार्गदर्शन करणारे व आपले प्रेरणास्थान असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक,आद्य सरसंघचालक, पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
नवे संकल्प करताना बहुदा आपण अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, यश आणि आनंद आपल्या आयुष्यात यावा, अशी सहज - स्वाभाविक आकांक्षा मनी ठेवतो. पण या अपेक्षांच्या गर्दीत एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न अनेकदा मागे पडतो—नेहमी काही मागत असताना आपण या समाजाला काय देणार आहोत? मिळविण्याची इच्छा ही मानवी स्वभावाचा भाग आहे; परंतु देण्याची वृत्तीच माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध करते. गाय साधे जलपान करते, पण ती आपल्याला अमृतासारखे दूध देते. याउलट सापही जलपान करतो, पण त्याच्यापासून विष निर्माण होते. या साध्या उदाहरणातून एक मोठा जीवन संदेश मिळतो,"माणसाची खरी किंमत त्याने काय मिळवले यावर नाही, तर त्याने इतरांसाठी काय दिले यावर ठरते." जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर त्याची व्याप्तीही सीमीतच राहते; पण आपल्या कृतींमधून, विचारांमधून आणि संवेदनशीलतेतून इतरांच्या आयुष्यात आनंद, आधार आणि प्रेरणा देण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते. एखाद्याच्या दुःखात धीर देणे, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, ज्ञान, प्रेम आणि सहकार्याची उब देणे, हीच माणुसकीची खरी ओळख आहे.
म्हणूनच नवीन वर्षाच्या संकल्पांचा अर्थ केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित न राहता समाजाभिमुख व्हावा. “मला काय मिळेल?” या विचाराच्या बरोबरच “मी काय देऊ शकतो?” हा विचारही मनात रुजला, तर आपल्या संकल्पांना एक व्यापक आणि अर्थपूर्ण दिशा मिळेल. कारण देण्यातूनच जीवनाला खरी उंची आणि अस्तित्वाला खरा अर्थ प्राप्त होतो.
मानवी जीवनातील काही घटना अत्यंत नैसर्गिक असल्या तरी त्यात गुंतागुंत होऊच शकते,गर्भधारणा आणि प्रसूती ही अशीच एक नाजूक प्रक्रिया आहे.आईच्या उदरात गर्भाला सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य, गर्भाच्या भोवताली असणारे संरक्षक कवच म्हणजेच 'अम्निओटिक मेंब्रेन' करते,कधीकधी हे कवच प्रसूतीच्या संभाव्य वेळेपूर्वीच फाटते आणि आतील द्रव बाहेर पडू लागतो. अशा परिस्थितीत अकाली प्रसूती होऊन कमी दिवसांचे तसेच कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते.अशा परिस्थितीत गरज असते योग्य उपचार, विश्रांती, संसर्ग टाळण्यासाठी सतत वैद्यकीय देखरेख यांची.या विषयावर सखोल मार्गदर्शन दिले आहे स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ डॉ.पल्लवी शेटे यांनी. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते हे केवळ उपचार देणारे आणि घेणारे असे मर्यादित नसून त्यात संवेदनशीलता, विश्वास, काळजी आणि सेवाभाव या मूल्यांचीही महत्त्वाची भूमिका असते. अनेक वेळा उपचार प्रक्रियेतून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात परस्पर विश्वासावर आधारलेले एक भावनिक नाते निर्माण होते व उपचार प्रक्रियेलाही सकारात्मक दिशा मिळते. अस्थिरोग सर्जन डॉक्टर अभिलाष पोहोकार यांनी मांडलेल्या हृदयस्पर्शी अनुभवातून डॉक्टर-रुग्ण नात्याची उब जाणवते. आजच्या तणावपूर्ण जीवन शैलीत आपण रोजच्या साचेबद्ध आयुष्यात अडकले असतो. अशात मनाकडे पाहण्याची आपल्याला फारशी संधी मिळत नाही. कामाच्या डेडलाईन्स पूर्ण करत असताना सर्व काही सुरळीत असल्याचा आव आणत प्रत्यक्षात मात्र मन तणावाच्या एका चक्रात अडकलेले असते. हा तणाव हळूहळू मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू लागतो.अशात स्वतःकडे लक्ष देणे, मनाला विश्रांती देणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे असते. समुपदेशक डॉ. वनिता राऊत यांनी तणावातून बाहेर पडण्याचे मार्ग, सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याचे महत्त्व,मानसिकदृष्ट्या स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक उपाय याबद्दल माहिती दिली आहे. आरोग्यदायी जीवनासाठी व्यक्तिगत काळजीबरोबर आपले आजूबाजूचे वातावरणही तितकेच स्वच्छ आणि मनाला शांती देणारे असणे आवश्यक आहे. प्रा . धनश्री पांडे यांनी या संदर्भात आरोग्य व मानसिक शांती राखणारे Healing architecture चे महत्त्व अधोरेखित केले आहे.
दरवर्षी ८ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या रंजना पांडे यांनी महिलांसाठी प्रेरणादायी असा लेख लिहिला असून स्त्रियांनी आत्मविश्वासाने पुढे जात राहावे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा आणि समाजाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे,असा सकारात्मक संदेश दिला आहे. आरोग्याच्या दृष्टीने अन्न पदार्थांबाबत जागरूकता असणेही आवश्यक आहे. काही व्यक्तींना विशिष्ट अन्नपदार्थांची अॅलर्जी असू शकते. या अॅलर्जीची कारणे समजून योग्य निदान व आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आहारतज्ज्ञ डॉ. संध्या जोशी यांनी या विषयावर मार्गदर्शन केले आहे. २० मार्च ' जागतिक मौखिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो.दंतरोग तज्ञ डॉ. स्नेहल वानखडे यांनी या निमित्ताने दातांच्या सामान्य समस्या व त्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत उपयुक्त माहिती दिली आहे. मानवी जीवनात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार करणे स्वाभाविक असते; परंतु खरे तर वर्तमानातील क्षणांना स्वीकारून, त्यांचा आनंद घेत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन अधिक अर्थपूर्ण बनवता येते. आमच्या रुग्णालयात कार्यरत ज्योती चंद्रे यांनी आपल्या विचारांमधून वर्तमानात जगण्याचे महत्त्व अत्यंत सुंदरपणे मांडले आहे. एकूणच पाहता आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे एवढेच नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचा समतोल साधणे होय. योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, मानसिक स्वास्थ्याची काळजी, स्वच्छ वातावरण, संतुलित आहार आणि सकारात्मक जीवनदृष्टी या सर्व गोष्टी एकत्र आल्या तरच निरोगी आणि आनंदी जीवन शक्य होते. या सर्व विषयांवर तज्ज्ञांनी दिलेली माहिती व अनुभव आपल्याला अधिक जागरूक, संवेदनशील आणि आरोग्यसंपन्न जीवनाकडे मार्गदर्शन करणारी ठरेल.



Comments