Stress loop & Your Nervous System
- Dr. Vanita Raut

- 6 hours ago
- 4 min read
“मी ठीक आहे…” म्हणताना आतून तुटत जाण्याची गोष्ट (stress Loop)
जीवनात नवीन काही तरी घडावे, चांगले घडावे, असे वाटणे काही चूक कुठाय ? रोज तोच - तोचपणा असला तर कंटाळा येणारच ना ! यामुळे होतं काय की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो, जेव्हा कामाचा, वेळेचा किंवा अपेक्षांचा ताण इतका वाढतो की, आपल्याला फक्त ओरडावेसे वाटते. हा तणाव म्हणजे जणू आपल्या मनात आलेला एक रुसलेला पाहुणा असतो, जो ऐकून घेण्याऐवजी गोंधळच घालतो. अशा वेळी तरीही तुम्ही कधी स्वतःला म्हटलं असेल , “मी ठीक आहे, फक्त हा आठवडा कसा तरी पार करायचा आहे...” मनाला दिलासा दिला पण तरी ते हट्टी मन जाम ऐकायला तयार नाही... शिवाय शरीरही तणावातच वाटत असेल, मन सतत विचारांनी भरलेलं असेल आणि आपल्याच जवळच्या लोकांवर चिडचिड होत असेल तर याचा अर्थ हाच की, कदाचित तुम्ही “स्ट्रेस लूप” मध्ये अडकलेले आहात.
स्ट्रेस लूप (Stress loop) म्हणजे आपली मज्जासंस्था (nervous system ) सतत संरक्षणाच्या (protection mode) अवस्थेत अडकून राहते. मनावर आलेला मूळ ताण हा खरा आणि दीर्घ काळासाठी असू शकतो. तणाव निर्माण होण्याची मुख्यत: दोन कारणे असतात, बाह्य कारणे व आंतरिक कारणे . उदा . कामाचा दबाव, कौटुंबिक वाद, आर्थिक ताण, आरोग्याच्या चिंता किंवा खूप व्यस्त दिनक्रम. पण कधीकधी नवीन काही घडत नसतानाही आतमध्ये तोच तणाव पुन्हा पुन्हा सक्रिय होत राहतो ...हाच loop आहे.
शरीर आणि मन सक्रीय राहण्यासाठी activation (सक्रिय होणे), reaction (प्रतिक्रिया) आणि recovery (पुनर्प्राप्ती) साखळी असते, पण सध्या ती पूर्ण होत नाहीय. त्यामुळे तुमची प्रणाली सतत ऑन (“on” )अवस्थेत राहते. हा प्रत्यक्षात मज्जासंस्थेशी संबंधित विकार आहे.
आपला मेंदू आपल्याला जीवंत ठेवण्यासाठी तयार झालेला आहे. जेव्हा तो धोका ओळखतो, तेव्हा stress response सुरू होतो. खरा आणि अल्पकालीन धोका असेल तेव्हा ही प्रतिक्रिया उपयुक्त असते. पण “आज“ चा ताण एकदाच येणारा नसतो आणि स्पष्टही नसतो . रोज ई मेल्स, डेड लाईन्स, नात्यातील तणाव, न सुटलेले आघात (trauma) आणि भविष्याबद्दल सततचा मानसिक ताण ! Stress response पुन्हा- पुन्हा सुरू होतो, पण त्याला खरा ऑफ (“off” )सिग्नल मिळत नाही.
मग काय होतं की काळानुसार अगदी लहान गोष्टीही जड वाटू लागतात, कारण
१) तुमच्या प्रणालीची क्षमता (capacity) कमी होते.
२) ताण तुमच्या विचारांवर परिणाम करतो.
३) विचार सतत तेच-तेच फिरत राहतात.
४) लक्ष मर्यादित होते.
५) विचार अधिक rigid होतात.
६) स्वतःवर टीका करणारा आवाज वाढतो.
७) भावना पटकन तीव्र होतात.
या सगळ्यातून बाहेर निघायचे असल्यास काही उदिष्ट तुम्ही ठरवायला हवीत ...उद्दिष्ट म्हणजे परिपूर्ण शांतता नव्हे ! पण त्यामुळे या loop चे विपरित दीर्घकाळ परिणाम तरी किमान आपल्यावर होणार नाहीत...आणि आपण आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेऊ शकू.
ही उद्दिष्ट आपण पुढील प्रमाणे ठरवू शकतो.
१. स्वक्षमता वाढवणे. २. स्वतःला वेळ देत, स्वतःसाठी अधिक जागा निर्माण करणे. ३. प्रतिक्रिया देताना अधिक लवचिकता आणणे. इतरांशी जुळवून घ्या.\ ४. जीवन व्यस्त असतानाही स्वतःशी आणि इतरांशी जोडलेले राहण्याची क्षमता वाढवणे. ५. प्रत्येक गोष्ट मला समजली पाहिजे , हा अट्टाहास न धरणे ६. मला कुठे relax वाटतं ते समजून घेऊन ..तिथे किंवा त्या गोष्टीसाठी वेळ काढणे.
जेव्हा बदल किंवा आव्हाने येतात तेव्हा तुमच्या शरीरात ताण ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या शारीरिक, भावनिक आणि वर्तणूक-संबंधी प्रतिक्रिया येऊ शकतात. प्रत्येकाला वेळोवेळी ताण येतो. तुम्ही तो टाळू शकत नाही. परंतु ताण व्यवस्थापन तंत्रे तुम्हाला त्याचा सामना करण्यास मदत करू शकतात. ताणतणावाच्या प्रतिक्रिया तुमच्या शरीराला नवीन परिस्थितींशी जुळवून घेण्यास मदत करतात. अभिनेत्री विद्या बालनने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने 'मुरांबा' चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याचे बोल वापरले: "अरे ऐक ना... जरा हसतोस का..." हा क्षण तणावावर मात करण्याचा एक अत्यंत हलका-फुलका आणि प्रभावी मार्ग दाखवतो—तो म्हणजे, स्वतःच्या तणावग्रस्त मनाशीच गप्पा मारणे ! कल्पना करा, तुमच्या डोक्यात बसलेला तणाव हा तुमच्या कुटुंबातील एखादा हट्टी आणि रुसलेला सदस्य आहे. तो तुमच्या मनाच्या कोपऱ्यात बसून सतत ओरडत आहे, धावपळ करत आहे, जुन्या चुकांची उजळणी करत आहे. अशावेळी, त्याच्यावर चिडण्याऐवजी त्याला म्हणा, "अरे ऐक ना जरा ! इथं कोपऱ्यात शांतपणे बसतोस का? हा रुसवा फुगवा सोड ना, आणि जरा हसतोस का? जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला किंवा तणावाला तिसरी व्यक्ती मानून, शांतपणे बोलता, तेव्हा तुम्ही त्याला बाहेरून बघू लागता. तुमच्या मनाचा गोंधळ एका क्षणात शांत होऊ लागतो, कारण तुम्ही भावनांशी एकजीव न होता, त्यांच्यापासून वेगळे होता. ही कल्पना विचित्र नाही, मानसशास्त्रीय आहे! एखादा छंद, मनाशी केलेला संवाद हे तुमच्यासाठी पॅटर्न ब्रेक (Pattern Break) म्हणून काम करतात. ताणलेल्या क्षणी मन लगेच त्या गाण्याच्या मूडमध्ये जाते आणि तणावाचा क्षण हलका होतो. पुढच्या वेळी जेव्हा तणाव वाढेल, तेव्हा चिडण्याऐवजी किंवा रडण्याऐवजी, तुमच्या मनातल्या त्या रुसलेल्या पाहुण्याला शांतपणे हाक मारा आणि म्हणा, "अरे ऐक ना, जरा हसतोस ना! कधी तर स्वतःशी किंवा "स्वतःवर हसा आणि तणावाला एका क्षणात हसण्यावारी न्या. स्ट्रेस लूप तोडण्यासाठी व्यायाम आणि हालचाल करा. रोज ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम केल्याने एंडॉर्फिन (Endorphins) संप्रेरक रिलीज होतात, जे तणाव कमी करतात. बोलून व्यक्त व्हा . नकारात्मक विचारांना 'थांबवा' (Stop Over thinking) अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 'Mindfulness' (वर्तमानात जगा) चा सराव करा. दररोज ७-८ तास शांत झोप घ्या. तसेच शरीर आणि मन ताजेतवाने राहण्यासाठी सकस आहार घेणे अनिवार्य आहे. स्ट्रेस लूप म्हणजे "समस्या, चिंता, ताण, पुन्हा नवीन समस्या" ...असे चालणारे दुष्टचक्र होय. हे चक्र तोडण्यासाठी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवणे आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. परंतु जेव्हा ताणतणाव कमी होत नाहीत किंवा विश्रांतीचा कालावधी मिळत नाही तेव्हा ताणतणाव एक समस्या बनतो. जेव्हा आपण सहन करु शकत नाही, ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारा. सध्याच्या काळात ताण ही सर्वाना अनुभवी लागणारी बाब झाली आहे.फारच थोड्या व्यक्ती ताणाचे चागल्या प्रकारे व व्यस्थापन करताना दिसतात. ताणाशी योग्य प्रकारे जुळवूनण घेता आल्यामुळे जीवनातील आनंद, स्वास्थ हरवलेल्या व्यक्तींची सर्वच वयोगटातील संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पण हा ताण पाहता पाहता कधी विक्राळ रूप धारण करतो. अनेक व्यक्ती ताणाची किमत मोजताना दिसतात. व्यसनाधीन होतात, निराशेच्या गर्तेत जातात. कुटुंब, व्यवसाय, नौकरीत देखील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम करतो; त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो. म्हणूनच “मी ठीक आहे…” म्हणताना आतून तुटत जावू नका. हसा, बोला...जीवन एकसारखे नसते. समोर येईल त्या संकटातही आनंद शोधत आणि प्रेमाने, दुवा देत जगणे महत्त्वा चे आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, काळ्याकुट्ट काळोखातही दिवा घेऊन उभे राहणे म्हणजेच खरा जगण्याचा आनंद आहे.
कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, सांगा कस जगायचं? कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत तुम्हीचं ठरवा ! वनिता राऊत मानस रोग तज्ञ



Comments