top of page

Premature Rupture of Membranes

३०-३१ आठवड्याची गर्भवती श्वेता खूप घाबरली होती कारण अचानक तिला योनीमार्गातून पाणी सुटल्यासारखं वाटलं,ती लगेच हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी आली. तपासणी अंती असे समजले की तिची आम्निओटिक सॅक अकाली म्हणजेच संभाव्य वेळेच्या फारच आधी फाटला आहे त्यामुळे हा असा पाण्यासारखा स्त्राव येणे सुरू झाले आहे. या त्रासामुळे गर्भाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यास गर्भाच्या वाढीवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आई होण्याचे दिवस मोठे सुखद असतात. पण या दिवसात बाळ जन्माला येईपर्यंत आईला अनेकदा विविध त्रासाला सामोरे जावे लागते. गर्भधारणेत ३७ आठवड्यांनंतर (प्रसूती कळा सुरू होण्यापूर्वी) गर्भाचे संरक्षण करणारी पिशवी (Amniotic sac) फुटून पाणी जाते,याला Rupture of membrane असे म्हणतात. हे सामान्यतः प्रसूती सुरू झाल्याचे लक्षण आहे, परंतु ३७ आठवड्यांपूर्वी घडल्यास त्याला प्रसूतीपूर्व पडदा फाटणे किंवा Premature rupture of membrane (PROM) असे म्हणतात. लक्षणे (Symptoms) : जर पाणी प्रसववेदना सुरू होण्यापूर्वी फुटले, तर पुढील लक्षणे जाणवू शकतातः १) अचानक पाण्यासारखा स्त्राव होणे - एकदम जास्त प्रमाणात किंवा हळूहळू गळती होणे २) अंतर्वस्त्र सतत ओले राहणे ३) स्त्रावाला साधारणपणे वास नसतो आणि तो पातळ, पांढरट/पारदर्शक असतो ४) वेदना नसतानाही पाणी जाणे ५) जर संसर्ग झाला असेल तर ताप, पोटदुखी किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव महत्वाचे म्हणजे: हा स्त्राव लघवीसारखा नसतो आणि स्वतःहून थांबत नाही यामुळे कोणते धोके उद्भवू शकतात? जर पाणी प्रसववेदना सुरू होण्यापूर्वी फुटले, तर मला आणि माझ्या बाळाला पुढील गोष्टींचा धोका असू शकतो?

१) आईसाठी: ताप येऊ शकतो किंवा गर्भाशयात संसर्ग होऊ शकतो. जीवाणूंना गर्भाशयात प्रवेश करण्याचा मार्ग तयार होतो, ज्यामुळे कोरियोअर्मेनियोनायटिस सारखे संक्रमण होण्याची शक्यता असते. प्रसूतीनंतरही इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. प्लेसेंटल ऍब्ब्रेशन : ही गंभीर स्थिती उद्भवते जेव्हा प्लेसेंटा गर्भाशयापासून वेळेपूर्वी विलग होतो, ज्यामुळे गंभीर रक्तस्त्राव होतो आणि माता आणि गर्भाच्या आरोग्य थोका निर्माण होतो. प्रसूती उशिरा लागली तर डॉक्टरांना औषधांनी प्रसववेदना सुरू कराव्या लागू शकतात. *कधी कधी ऑपरेशन (सीजेरियन) करावे लाग शकते. २) बाळासाठी: जर गर्भधारणा पूर्ण झालेली नसेल, तर बाळ अकाली (preterm) जन्माला येऊ शकतो बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. बाळाला जन्मानंतर श्वास घेण्यास त्रास (RDS) होऊ शकतो. पाणी कमी झाल्यामुळे बाळाला ताण (fetal distress) येऊ शकतो. क्वचित प्रसंगी, बाळाच्या नाळेची अडचण (cord problem) निर्माण होऊ शकते.

म्हणूनच पाणी फुटल्यास, वेदना नसल्या तरी ताबडतोब रुग्णालयात जाणे महत्त्वावे आहे, जेणेकरून आई आणि बाळ दोघांची सुरक्षितता राखता येईल. PROM चे व्यवस्थापन व उपचार : PROM चे व्यवस्थापन गर्भधारणेचे वय आणि कोणत्याही संसर्ग किंवा इतर गुंतागुंतांच्या उपस्थितीवर अवलंबून असते. 1) रुग्णालयात तपासणी *तुमचा ताप, रक्तदाब, नाडी तपासली जाईल. बाळाचे हृदयाचे ठोके (CTG) पाहिले जातील. *गरज असल्यास रक्त तपासणी/सोनोग्राफी केली जाईल. अनावश्यक आतील (vaginal) तपासणी टाळली जाईल, जेणेकरून संसर्गाचा धोका कमी राहील. २)जर गर्भधारणा पूर्ण (९ महिने) झाली असेल - Term PROM बहुतेक वेळा प्रसूती 24 तासांत सुरू होते. वेदना सुरू न झाल्यास, डॉक्टर औषधांनी प्रसूती सुरू (induction) करू शकतात. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी काही वेळा अँटिबायोटिक्स दिली जातात. प्रसूतीदरम्यान आई आणि बाळावर सतत लक्ष ठेवले जाते. ३)जर गर्भधारणा पूर्ण नसल्यास - Preterm PROM (PPROM) अपेक्षित व्यवस्थापन . हॉस्पिटलायझेशनः संसर्ग किंवा गर्भाच्या त्रासाच्या लक्षणांवर बारकाईने निरीक्षण करण्यासाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असू शकते. शक्य तितक्या सुरक्षितपणे गर्भधारणा लांबणीवर टाकण्यासाठी आई आणि गर्भ दोघांचेही बारकाईने निरीक्षण करणे समाविष्ट आहे. आई व बाळाची स्थिती चांगली असल्यास, काही वेळा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले जाते. अँटिबायोटिक्स दिली जातात (संसर्ग टाळण्यासाठी). बाळाच्या फुफ्फुसांच्या विकासासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्सचे इंजेक्शन दिले जाऊ शकते. इंजेक्शन गर्भाच्या फुफ्फुसांच्या परिपक्वताला गती देऊ शकते. गरज असल्यास बाळाच्या मेंदूच्या संरक्षणासाठी इंजेक्शन मॅग्नेशियम सल्फेट दिले जाऊ शकते. संसर्ग, बाळाला त्रास किंवा इतर गुंतागुंत झाल्यास प्रसूती लवकर करावी लागू शकते. तर महिलांनो, लक्षात ठेवा : प्रसववेदना सुरू होण्यापूर्वी पाणी फुटणे (PROM) ही परिस्थिती घाबरण्यासारखी नाही, पण ताबडतोब वैद्यकीय काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी फुटल्याचा संशय आला तर वेदना असोत किंवा नसोत, लगेच रुग्णालयात जा. वेळेत उपचार घेतल्यास आई आणि बाळ दोघांचीही सुरक्षितता राखता येते. डॉक्टर तुमची आणि बाळाची नियमित तपासणी करून योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. ताप, पोटदुखी, दुर्गंधीयुक्त स्त्राव किंवा बाळाची हालचाल कमी झाल्यास लगेच कळवा. श्वेता वेळेवर रुग्णालयात आली, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल राहिली ,सर्व सूचना पाळल्या आणि तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला. लवकर निदान + योग्य उपचार= सुरक्षित आई आणि निरोगी बाळ डॉ . पल्लवी शेटे स्त्री रोग व प्रसूती तज्ञ


 
 
 

Comments


bottom of page