top of page

DHH - Editorial - Aug 2026

आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी l
किती चातक चोचीने
प्यावा वर्षा ऋतू तरी ll

बघता बघता वर्षा ऋतूचे आगमन झाले आणि मनाला प्रसन्न करून गेले.सहा ऋतूंची ही अखंड परिक्रमा आपल्या जीवनाला नित्य नवे रंग देत राहते. बदल हेच जगाचे शाश्वत स्वरूप असले, तरी निसर्गाच्या या बदलांमध्ये एक विलक्षण नियमितता आणि शिस्त दडलेली असते. कडक उन्हानंतर येणाऱ्या या पावसाच्या सरी धरतीला आणि मनालाही तृप्त करतात.

आज "कवी कालिदास दिन" आणि  निरामय या आपल्या आवडीच्या त्रैमासिकाचा नववा वर्धापनदिन. नऊ वर्षांचा हा प्रवास निश्चितच समाधान देणारा आहे, प्रत्येक अंक सादर करताना आमच्या मनातील उत्साह आणि जबाबदारीची भावना आजही तितकीच ताजी आहे. वाचकांचे प्रेम, सहकार्य आणि विश्वास यांच्यामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.

काळाच्या ओघात समाज बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि त्याबरोबर माणसांच्या जगण्याच्या पद्धतीही बदलतात. साधारणपणे दर पंधरा वर्षांनी एक नवीन पिढी समाजात सक्रिय होत असते. प्रत्येक पिढीचा स्वभाव, तिच्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि संघर्ष वेगळा असतो. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना माणूस अनेक नवे शोध लावतो, नवी साधने निर्माण करतो आणि जीवन अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हीच साधने आणि सुविधा नव्या समस्याही निर्माण करत असतात.

एकीकडे  हवा, पाणी आणि माती यांचे प्रदूषण वाढल्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत.जागतिक तापमानवाढ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा आणि नैसर्गिक आपत्ती ही त्याचीच लक्षणे आहेत तर दुसरीकडे, आरोग्याच्या क्षेत्रातही मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक विकार वाढताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत.  पर्यावरणाचे नुकसान होत आहे , आरोग्य धोक्यात येत आहे,आपल्याला त्यांचे परिणाम माहिती आहेत. हे समजत असूनही व्यक्तिगत पातळीवर आवश्यक ते बदल करताना आपण फारसे दिसत नाही. "कळते पण वळत नाही" हीच आजच्या समाजाची सर्वात मोठी शोकांतिका बनली आहे.

"मी एकट्याने काय करणार?", "माझ्यामुळे काय फरक पडणार आहे?" किंवा "सगळेच असे करतात" अशा विचारांमुळे आपण अनेकदा निष्क्रिय बनतो.ही अनास्था अनेक सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांच्या मुळाशी आहे. प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापरा असे कितीही सांगितले तरी प्रत्यक्षात त्याचे पालन करणाऱ्यांची संख्या मर्यादितच दिसते. मुलांचे स्क्रीन व्यसन कमी व्हावे म्हणून अनेक चर्चा होतात; परंतु त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे पालक तुलनेने कमी आढळतात. 

शाळेत मुलांना जंक फूडचे दुष्परिणाम शिकवले जातात, तरीही फास्ट फूड आणि रस्त्याकडील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर प्रचंड गर्दी दिसते.या मोहावर नियंत्रण ठेवणे आपल्याला जमत नाही. मग प्रश्न पडतो की,आपल्या स्वतःच्या, आपल्या मुलांच्या आणि एकुण समाजाच्या भविष्यासंबंधी ही उदासीनता निर्माण कशी होते?

या प्रश्नाचे उत्तर प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात सापडते. ग्रीक तत्त्वज्ञानात याला अक्रासिया (Akrasia) असे म्हणतात. याचा अर्थ — "स्वतःच्या योग्य निर्णयाविरुद्ध वागण्याची प्रवृत्ती" किंवा "इच्छाशक्तीचा कमकुवतपणा"

 आपल्याला योग्य काय आहे हे माहीत असतानाही  अशा हानिकारक गोष्टी करण्यामागील पहिले कारण म्हणजे तत्काळ समाधानाची ओढ, म्हणजेच आपला मेंदू भविष्यातील मोठ्या फायद्यांपेक्षा आत्ताच्या छोट्या आनंदाला अधिक महत्त्व देतो. आत्ता खाल्लेला गोड पदार्थ, आत्ता पाहिलेला व्हिडिओ किंवा आत्ता मिळालेला आराम हा भविष्यातील आरोग्य, बचत किंवा यशापेक्षा अधिक आकर्षक वाटतो.

दुसर म्हणजे  मेंदूमध्ये निर्माण होणारे डोपामिन हे रसायन आनंदाची अनुभूती देते. एखादी कृती आनंददायी वाटली की ती पुन्हा करण्याची इच्छा निर्माण होते. हळूहळू ती कृती सवय बनते आणि नंतर व्यसनात रूपांतरित होऊ शकते आणि तिसरे कारण म्हणजे मेंदूला शक्य तितकी ऊर्जा वाचवायची असते.नवीन आणि चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, तर जुन्या सवयी आपोआप घडत राहतात. म्हणूनच चुकीच्या सवयी सोडणे आणि चांगल्या सवयी अंगीकारणे कठीण वाटते.

या वर उपाय म्हणून एखादी वाईट सवय मोडायची असेल तर तिच्यासमोर अडथळे निर्माण करा. उदाहरणार्थ, रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय कमी करायची असेल तर झोपताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा.तसेच चांगल्या सवयी सोप्या करा जसे की अधिक पाणी पिण्याची सवय लावायची असेल तर टेबलावर नेहमी भरलेली पाण्याची बाटली ठेवा. चालण्याची सवय लावायची असेल तर बूट आणि कपडे आधीच तयार ठेवा.

या बरोबरच आवश्यक आणि आवडीच्या गोष्टींची सांगड घाला,आवश्यक कामांना आनंददायी गोष्टींची जोड दिल्यास त्या सवयी टिकून राहतात. व्यायाम करताना आवडते संगीत ऐकणे, घरकाम करताना आवडता कार्यक्रम ऐकणे किंवा अभ्यासानंतर स्वतःला छोटीशी बक्षिसे देणे हे त्याची उदाहरणे आहेत.
आपल्या मनात एखादी इच्छा निर्माण झाली, की त्या इच्छेच्या मागे लगेच धावण्याऐवजी तिला नीट पारखून तिच्या परिणामांचा विचार करा. हा काही क्षणांचा जागरूक विराम अनेक चुकीचे निर्णय टाळू शकतो.

कदाचित म्हणूनच आज आपल्याला तंत्रज्ञानाची, सुविधांची किंवा माहितीची नव्हे, तर विवेकाची आणि सजगतेची अधिक गरज आहे. पुढील पिढ्यांना चांगले भविष्य द्यायचे असेल, तर बदलाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासूनच करावी लागेल.

आषाढाच्या या पावसाळी वातावरणात चातक पक्षी जसा एका थेंबाची आतुरतेने वाट पाहतो, तशीच आज समाजालाही विवेक, जबाबदारी आणि सजगतेच्या काही थेंबांची गरज आहे.
सध्यातरी आपण सर्वांनी एकच प्रार्थना करावी —

"शहाणपण देगा देवा!"

कारण योग्य काय आहे हे समजणे महत्त्वाचे आहेच; पण त्याप्रमाणे वागण्याचे सामर्थ्य मिळणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे.
                                						
													 डॉ. प्रज्ञा बनसोड

 
 
 

Comments


bottom of page