top of page

वृक्षवल्ली... मायेची सावली...

पावसाच्या पहिल्या सरी बरसल्या आणि डॉ.हेडगेवार हॉस्पिटल व संवेदना आरोग्य प्रसार उपक्रमाच्या वतीने वृक्षारोपणाचा संकल्प प्रत्यक्षात उतरला. वैद्यकीय सेवा देण्याइतकेच निरोगी समाज आणि निरामय पर्यावरण घडविणेही आमचे कर्तव्य आहे, या भावनेतून काही औषधी तर काही पिढ्यानपिढ्या मायेची सावली देणारी वृक्षप्रजाती आम्ही जाणीवपूर्वक निवडल्या. झाडे केवळ मातीमध्ये उभी असलेली सजीव रचना नाहीत; ती आपल्या श्वासांची राखण करणारी, निसर्गाशी असलेले आपले अदृश्य नाते जपणारी जीवनरेषा आहेत. कवी शांताराम खामकर यांच्या ओळी वृक्षांचे हे निःस्वार्थ जीवन अत्यंत हृदयस्पर्शीपणे उलगडतात सोपं नसतं झाड होणं

मातीमध्ये रुजून येणं एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं.... सोपं नसतं झाड होणं सूर्य डोई घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो बसेल त्याला झुळूकभर वारासुद्धा द्यावा लागतो सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते ते देत जाणं.... सोपं नसतं झाड होणं तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही घाव दिले कोणी तरी रडता येत नाही

सोपं नसतं ओठ शिवून

सगळं सोसत जाणं...सोपं नसतं झाड होणं

नव्यासाठी जुनं निमूट

सांडून द्यावं लागतं

ऋतू-ऋतू म्हणेल तसं

जगून घ्यावं लागतं सोपं नसतं आयुष्याचं

खोल गाडून घेणं....

सोपं नसतं झाड होण.......!!!


आज ग्रामीण भागही झपाट्याने बदलत आहे. पक्की घरे, सिमेंटचे रस्ते आणि वाढती रासायनिक फवारणी यामुळे निसर्गाशी असलेले आपले नाते कमकुवत होत चालले आहे. जमिनीची सुपीकता कमी होत आहे आणि श्वसन व त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी वृक्ष आपल्यासाठी कल्पवृक्षासारखे उभे राहतात— शीतल सावली देतात, फळे-फुले देतात, औषधे देतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध प्राणवायू देतात.

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या संत तुकारामांच्या वचनात वृक्षांविषयीची आपुलकी आणि कृतज्ञता दडलेली आहे. झाडे लावणे ही केवळ पर्यावरण चळवळ नसून भविष्यातील पिढ्यांसाठी केलेली जीवनाची गुंतवणूक आहे. झाडे हवेतील प्रदूषण कमी करतात, मातीची धूप थांबवतात, जैवविविधतेचे संरक्षण करतात आणि जागतिक तापमानवाढीच्या संकटाशी लढण्याचे सामर्थ्य देतात.

झाडे म्हणजे पृथ्वीची फुप्फुसे, निसर्गाचे रक्षक आणि जीवनाचे खरे साथीदार. ती स्वतः उन्हात उभी राहतात आणि आपल्याला सावली देतात. म्हणूनच वृक्षारोपणाइतकेच वृक्षसंवर्धनही महत्त्वाचे आहे.

आज देव शोधताना आपण मंदिरांत आणि दगडांत भटकतो; पण जीवन देणारा देव तर या हिरव्यागार वृक्षांमध्ये उभा आहे. म्हणून प्रत्येकाने एक झाड लावण्याचा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते जगविण्याचा संकल्प करायला हवा.

शांताबाई शेळके यांच्या शब्दांत या नात्याची सुंदर अभिव्यक्ती पाहा —

हे एक झाड आहे: याचे माझे नाते वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते मला आवडतो याच्या फुलांचा वास वासामधून उमटणारे जाणीवओले भास पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बाळगणी याच्या कटिखांदी मातीचे झाड : झाडाची मी : माझी पुन्हा माती याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन अनिता कुलकर्णी


 
 
 

Comments


bottom of page