top of page

विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास



योग जागावा, योग आचरावा, योग रुजवावा घरोघरी ...



योग विद्या ही आध्यात्मिक विद्या आहे. योग विद्येचा प्रचार आणि प्रसार शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. कारण यामुळे मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि प्रतिकार शक्ती वाढते. उच्चार शुद्ध होतात. मुळात शरीर सुदृढ आणि अंतर्बाह्य निकोप असल्यास सहजच आरोग्य लाभते. म्हणूनच विद्यार्थ्यांना या विद्येविषयी कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, तसेच योगाभ्यासाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना योगाभ्यासाचे महत्व सांगणे अगत्याचे आहे. योग शिक्षक हे त्यांचे स्फूर्तीस्थान होणे आवश्यक आहे.


योगाभ्यास विद्यार्थ्यांना सदसद्विचार शिकवितो. योग शिक्षण देण्यासाठी मुलांना सर्वप्रथम मानवी शरीर रचना, आरोग्याचे महत्त्व समजावून द्यायला पाहिजे. लहान वयातच विद्यार्थ्यांना गोष्ट रूपाने योग महर्षी याज्ञवलक्य, योगगुरू वसिष्ठ, विश्वामित्र, बुद्ध आणि महावीर यांची चरित्रे सांगायला हवेत आणि हे कार्य शिक्षका प्रमाणेच पालक अधिक प्रभावीपणे करू शकतात.


शुद्ध आहार, शुद्ध शरीर, शुद्ध मन, शुद्ध विचार :

आपण रोज खाल्लेल्या अन्नावरच शरीर पेशी पोसल्या जातात आणि अन्नसत्वातून मन सुक्ष्म बनते. म्हणून मनुष्याला शुद्ध आहाराची जरुरी असते. शुद्ध आहार, शुद्ध शरीर, शुद्ध मन आणि म्हणूनच शुद्ध विचार असतात. हे सगळे आपल्याला मिळावे म्हणूनच दैनंदिन आहार- विहाराचे महत्त्व मुलांना आवर्जून समजायला हवे.

सामान्यतः आरोग्य विशेषतः बाल आणि युवा गटाचे आरोग्य, पचन संस्था, श्वसन अभिसारण संस्था आणि मज्जासंस्था यावर अवलंबून असते. ते आसन, प्राणायाम अभ्यासाने संपादन करता येते.


सूर्य नमस्कार उपयोगी :

विद्यार्थ्यांना उपयुक्त आसनांचा विचार केल्यास रोज सूर्य नमस्कार घालावेत. एका सूर्य नमस्कारामध्ये १२ आसनांचा समावेश होतो. हळूहळू सूर्यनमस्कारांची संख्या वाढवावी. शरीराला बांधेसुद्पणा आणण्यासाठी, स्नायूंना ताकद मिळवून देण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे रक्त शुद्धीसाठी अनुक्रमे ताडासन, पाठीवरचे आणि पोटावरचे नौकासन, धनुरासन, वज्रासन इत्यादी आसनांचा दैनंदिन योगाभ्यासामध्ये समावेश करावा.


वाणी सुधार :

काही मुलांचे उच्चार स्पष्ट होत नसतील, म्हणजे वाचताना - बोलताना काही मुले अडखळतात, अडखळत बोलतात त्यांच्यासाठी जिभेचा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे. संस्कृत विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हे फारच उपयुक्त आहे. थेरपीमध्ये याचा उल्लेख येतो. मंत्र, प्रार्थना, सुभाषितांचे पाठांतर केल्यास उच्चार अधिक स्पष्ट होतात.


दृष्टीदोष कमी होतो :

डोळ्यांचे व्यायाम, मानेसाठी उपयुक्त आसने, शरीर संचालन इत्यादी सूक्ष्म व्यायामाचा निरंतर अभ्यास केल्यास दृष्टीदोष, तसेच चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. प्रकृतीने आपल्याला ज्ञानशक्ती, क्रिया शक्ती आणि इच्छाशक्ती प्रदान केलेली आहे. या शक्तीचा जागर होण्यासाठी सुद्धा योग आसने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास करावा.


मनाची एकाग्रता :

विद्यार्थी स्वभावतः चंचल असेल, मनाची स्थिरता होत नसेल, बुद्धीचापल्य, ग्रहण शक्ती कमी असेल त्यासाठी भ्रमरी प्राणायामाचा अभ्यास करावा. भ्रामरीमुळे मेलाटिन नावाचे रसायनाचा स्त्राव निर्माण होण्यास मदत होते. निसर्गत: ब्रह्म मुहूर्तावर शरीरामध्ये हे रसायन आपल्या शरीरामध्ये तयार होते. यामुळे मुलांची एकाग्रता वाढायला मदत होते. त्याचा उपयोग त्यांना शालेय अभ्यासामध्ये होऊ शकतो.


अनुवंशिक व्याधी :

काही व्याधी पालकांकडून पाल्यांमध्ये अनुवंशिक रीतीने संक्रमित होत असतात. आसन प्राणायामाच्या माध्यमातून या व्याधी पूर्णत: बऱ्या होण्यास मदत होते किंवा या व्याधींची तीव्रता निश्चितच कमी होऊ शकते.

खेळ आणि योगासने यांच्यात खूपच फरक आहे. खेळामध्ये शरीराला व्यायाम मिळतो परंतु तो स्नायू संस्थेपर्यंतच मर्यादित असतो. आसनानी शरीरातील सर्व अवयवांना प्राणशक्ती दिली जाते. इतर व्यायामात ती खर्ची पडते. शरीर संस्थेकडून कार्यक्षमता वाढविण्यास आसने सहकार्य करतात. काही आसने शरीराच्या विशिष्ट भागाला आणि विशिष्ट अवयवाला क्रियाशील करतात तर काही आसने विशिष्ट भागाला शांत करतात.


तज्ञ मार्गदर्शन आवश्यक :

योगाभ्यास हा योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावा. टी.व्ही. किंवा डिजिटल माध्यमांद्वारे वेगळा अभ्यास करू नये. कारण आसन, प्राणायाम करताना चुका झाल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला अनुभवास येतात. मग योगाभ्यासाविषइ मनात गैरसमज निर्माण होतात.

आपल्या प्रकृतीनुसार योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये स्पर्धा नसावी. एखादे आसन करताना त्रास होत असल्यास बळजबरी करू नये. त्यासाठी काही साधनांचा उपयोग करावा. उदा. योगा बेल्टचा वापर करता येतो.

योगाभ्यास रामप्रहरी किंवा सायंकाळी करावा. जेवण झाल्यानंतर साधारणतः पाच ते सहा तासांनी करावा.

योगाभ्यास स्थूल शरीराकडून सूक्ष्म शरीराकडे, नराकडून नारायणाकडे, सामान्याकडून असामान्याकडे नेणारा आहे.


शरीरमाद्यं खलु धर्म साधनम् ।


योगशिक्षक

राजेश माळोदे

मुधोळकर पेठ, अमरावती.


 
 
 

Comments


bottom of page