लव्ह युवर लिव्हर
- Dr. Bhavik Changole

- Aug 1
- 4 min read
मानवी शरीर हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असला, तरी काही अवयव असे आहेत की त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. त्यापैकी एक म्हणजे लिव्हर.

लिव्हर हा शरीरातील सर्वांत मोठा अंतर्गत अवयव आणि सर्वांत मोठी ग्रंथी आहे. प्रौढ व्यक्तीमध्ये त्याचे वजन साधारण १.२ ते १.५ किलोग्रॅम असते. पोटाच्या उजव्या वरच्या भागात, डायफ्रॅमच्या खाली त्याचे स्थान असते. हृदय आणि फुफ्फुसांनंतर शरीराच्या कार्यक्षमतेत सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अवयवांमध्ये लिव्हरचा समावेश होतो.
लिव्हरची खास गोष्ट म्हणजे ते शरीरातील ५०० हून अधिक महत्त्वाची जैव रासायनिक कार्ये पार पाडते. त्यामुळे त्याला शरीराची "रासायनिक प्रयोगशाळा", "जैविक कारखाना" किंवा "शरीराचे नियंत्रण केंद्र" असेही म्हटले जाते.
आजकाल मधुमेह, लठ्ठपणा, बदलती जीवनशैली, मद्यपान आणि अयोग्य आहारामुळे लिव्हरच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी लिव्हरचे आजार म्हणजे फक्त मद्यपान करणाऱ्यांचा प्रश्न समजला जात असे; परंतु आता मद्यपान न करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्येही फॅटी लिव्हर (MASLD) मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्याबद्दल जागरूक असणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
लिव्हर इतके महत्त्वाचे का आहे?
आपण जे अन्न खातो त्यातील पोषक द्रव्ये आतड्यांतून शोषली गेल्यानंतर ती सर्वप्रथम लिव्हरपर्यंत पोहोचतात. लिव्हर या पोषक द्रव्यांवर प्रक्रिया करून शरीराला आवश्यक त्या स्वरूपात त्यांचा वापर करते. तसेच रक्तातील विषारी पदार्थांचे निरुपद्रवीकरण करून ते शरीरातून बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कामही लिव्हर करते.
थोडक्यात सांगायचे झाले तर, शरीरात जे काही खाल्ले, प्यायले किंवा औषधांच्या स्वरूपात घेतले जाते, त्यावर अंतिम प्रक्रिया करण्याचे काम लिव्हर करते.
लिव्हरचे आजार:
लिव्हरचे आजार विविध कारणांनी होऊ शकतात. त्यांपैकी प्रमुख आजार पुढीलप्रमाणे आहेतः
१) फॅटी लिव्हर (MASLD): लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साचल्यामुळे होणारा आजार.
२) अल्कोहोलिक लिव्हर डिसीजः दीर्घकाळ मद्यपानामुळे होणारे लिव्हरचे नुकसान.
३) हिपॅटायटिस A, B, C आणि E: विषाणूंमुळे होणारी लिव्हरची सूज.
४) सिरोसिसः दीर्घकालीन सूज किंवा इजेमुळे लिव्हरमध्ये व्रण (Fibrosis) तयार होणे.
५) लिव्हरचा कर्करोग (Hepatocellular Carcinoma): बहुधा सिरोसिस किंवा दीर्घकालीन हिपॅटायटिसनंतर विकसित होणारा कर्करोग.
६) औषधांमुळे किंवा विषारी पदार्थांमुळे होणारे लिव्हरचे नुकसान (Drug-induced Liver Injury).
७) ऑटोइम्यून लिव्हर डिसीज आणि काही आनुवंशिक लिव्हर विकार.
लिव्हरच्या आजारांची लक्षणे:
सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक लिव्हर विकारांमध्ये कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. रोग वाढल्यानंतर मात्र पुढील लक्षणे जाणवू शकतात.
उजव्या वरच्या पोटात वेदना किंवा जडपणा, सतत थकवा व अशक्तपणा, मळमळ, उलट्या किंवा भूक मंदावणे, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ), गडद रंगाची लघवी, फिकट रंगाचा शौच, किंवा पाय, घोटे अथवा पोटावर सूज येणे, त्वचेला खाज येणे, सहज रक्तस्राव किंवा निळे डाग पडणे, वजन कमी होणे इ.
लिव्हरच्या आजारांचे निदान:
लिव्हरच्या आजाराचे निदान करण्यासाठी रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि विविध तपासण्यांचा आधार घेतला जातो.
रक्त तपासण्या (Liver Function Tests - LFT): यामध्ये SGOT (AST), SGPT (ALT), ALP, GGT, बिलिरुबिन, अल्ब्युमिन आणि INR यांसारख्या चाचण्यांद्वारे लिव्हरची कार्यक्षमता तपासली जाते.
इमेजिंग तपासण्याः अल्ट्रासोनोग्राफी, फायब्रोस्कॅन, सीटी स्कॅन किंवा एमआरआयद्वारे लिव्हरतील चरबी, सूज, फायब्रोसिस किंवा गाठींचे निदान करता येते.
लिव्हर बायोप्सीः गरज भासल्यास सूक्ष्म सुईद्वारे लिव्हरचा छोटा ऊतक नमुना घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. यामुळे आजाराची तीव्रता आणि प्रकार निश्चित करता येतो.
सुदैवाने, लिव्हरच्या बहुतांश आजारांचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.
लिव्हरच्या आजारांवरील उपचार:
उपचार हा आजाराच्या कारणावर आणि टप्प्यावर अवलंबून असतो. वजन कमी करणे आणि नियमित व्यायाम, संतुलित आहार व साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाण कमी करणे, मद्यपान पूर्णपणे बंद करणे इ. हिपॅटायटिसवरील योग्य औषधोपचार:
आवश्यकतेनुसार रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करणारी औषधे, सिरोसिस किंवा इतर गुंतागुंतींवर विशेष उपचार, लिव्हर निकामी झाल्यास लिव्हर प्रत्यारोपण (Liver Transplantation).
लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक नियम :
१. योग्य वजन राखा:
लठ्ठपणा किंवा अतिरिक्त वजन हे मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) अर्थात फॅटी लिव्हरचे सर्वात महत्त्वाचे जोखीम घटक आहेत. शरीराचे वजन ५-१०% कमी केल्याने लिव्हरतील चरबी, दाह आणि फायब्रोसिस कमी होण्यास मदत होते. त्यामुळे संतुलित आहार व नियमित व्यायामाद्वारे योग्य वजन राखणे अत्यंत आवश्यक आहे.
२. संतुलित आणि सकस आहार :
जास्त उष्मांक असलेले पदार्थ, संतृप्त चरबी (Saturated Fat), रिफाइंड कार्बोहायड्रेट्स (उदा. मैद्याचा ब्रेड, पांढरा तांदूळ, पास्ता) आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवा. आहारात ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ (Fiber), कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, मासे, सुका मेवा आणि आरोग्यदायी वनस्पतीजन्य तेलांचा समावेश करा. पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
३. नियमित व्यायाम करा:
दररोज किमान ३०-४५ मिनिटे चालणे, धावणे, सायकलिंग किंवा इतर शारीरिक व्यायाम केल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्सचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि लिव्हरतील चरबी कमी होण्यास मदत होते.
४. विषारी रसायनांपासून स्वतःचे संरक्षण करा:
स्वच्छतेची रसायने, कीटकनाशके, एरोसोल स्प्रे आणि इतर औद्योगिक रसायने लिव्हरच्या पेशींना हानी पोहोचवू शकतात. अशा पदार्थांचा वापर करताना हवेशीर जागा निवडा, आवश्यक असल्यास मास्क वापरा आणि धूम्रपान टाळा.
५. मद्यपान टाळा किंवा अत्यंत मर्यादित ठेवा:
अतिमद्यपानामुळे लिव्हरच्या पेशींचा नाश होऊन फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हिपॅटायटिस आणि पुढे सिरोसिस होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो मद्यपान टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अत्यंत मर्यादित प्रमाणातच करावे.
६. अंमली पदार्थांपासून दूर राहा:
बेकायदेशीर अंमली पदार्थ आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतलेली काही औषधे लिव्हरचे गंभीर नुकसान करू शकतात.
७. दूषित सुया वापरू नका:
इंजेक्शन, टॅटू किंवा शरीर छिद्र (Body Piercing) करताना नेहमी निर्जंतुक आणि एकदाच वापरण्याच्या सुया वापरल्या जात आहेत, याची खात्री करा. दूषित सुईमुळे हिपॅटायटिस बी, सी आणि इतर संसर्ग होऊ शकतात.
८. रक्ताच्या संपर्कानंतर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या:
दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताशी संपर्क आल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक असल्यास हिपॅटायटिस व इतर संसर्गांच्या तपासण्या करून घ्याव्यात.
९. वैयक्तिक वापराच्या वस्तू इतरांसोबत शेअर करू नका.
दाढीचे ब्लेड, टूथ ब्रश, नेलकटर यांसारख्या वस्तूंवर सूक्ष्म प्रमाणात रक्त असू शकते. त्यामुळे या वस्तू वैयक्तिकच वापराव्यात.
१०. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा:
असुरक्षित लैंगिक संबंध किंवा अनेक जोडीदार असल्यास हिपॅटायटिस बी आणि इतर संसर्गांचा धोका वाढतो. सुरक्षित लैंगिक व्यवहाराचा अवलंब करा.
११. हात स्वच्छ धुवा:
स्वच्छता संसर्ग टाळण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. शौचालय वापरल्यानंतर, लहान मुलांची स्वच्छता केल्यानंतर आणि अन्न बनवण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी साबणाने हात धुण्याची सवय लावा.
१२. औषधे डॉक्टरांच्या सूचनेनुसारच घ्या:
औषधांचा अतिरेक, चुकीचे औषध किंवा अनेक औषधांचे अयोग्य मिश्रण लिव्हरला हानी पोहोचवू शकते. मद्यपान आणि औषधे एकत्र घेणे टाळा. तसेच आयुर्वेदिक, हर्बल किंवा आहार पूरक (Supplements) घेत असल्यास त्याची माहिती डॉक्टरांना अवश्य द्या.
१३. लसीकरण करा :
हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी या आजारांपासून संरक्षण देणाऱ्या प्रभावी लसी उपलब्ध आहेत आणि जोखीम असलेल्या व्यक्तींनी त्या अवश्य घ्याव्यात. मात्र, हिपॅटायटिस सी साठी अद्याप प्रभावी लस उपलब्ध नाही. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे हेच सर्वोत्तम संरक्षण आहे.
लिव्हर हे शरीराचे सर्वांत महत्त्वाचे जैव रासायनिक केंद्र आहे. सुरुवातीच्या अवस्थेत लिव्हरचे बहुतांश आजार कोणतीही लक्षणे देत नाहीत. त्यामुळे जोखीम असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करून घेणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Love your liver..
डॉ. भाविक चांगोले,
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती.



Comments